अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- रस्त्याच्याकडेला दुचाकी उभी करून समोर असलेल्या फळविक्रेत्याच्या गाडीवर फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका जणाला फळे खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे.
फळे करून परत येईपर्यंत मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले १ लाख ४० हजारांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना श्रीरामपूर मेन रोड येथे घडली. याप्रकरणी सदाफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, श्रीरामपूर शहरातील मेन रोड रोडवर मोठ्या संख्येने फळविक्रेते बसलेले असतात, शहरातील किंवा अन्य भागातील लोक खास फळे घेण्यासाठी याच भागात येत असतात.
त्यानुसार श्रीरामपूर जवळील खंडाळा येथील अविनाश बापूसाहेब सदाफळ हे काल श्रीरामपूर शहरात काही कामानिमित्त आले होते. त्यानंतर येथील मेन रोडवर असणाऱ्या गोविंद ज्वेलर्स समोर फळांची हातगाडी उभी होती.
या फळांच्या हातगाडीवर सदाफळ हे फळे घेण्यासाठी थांबले. या दरम्यान त्यांनी आपली मोटारसायकल बाजूला उभी केली व फळे घेण्यासाठी त्या गाडीकडे गेले. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीचे लॉक तोडून आत ठेवलेली १ लाख ४० हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली.
फळे घेवून आल्यानंतर आपली चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने आजुबाजूला चौकशी केली, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाला होते.
या सदाफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल काळे हे करीत आहेत.