अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोरोनाविरोधी लढ्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या इस्रायलने आता घरात आणि बंदिस्त ठिकाणीदेखील मास्क घालण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. इस्रायलने यापूर्वीच मोकळ्या ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती रद्द केली होती.
देशात व्यापक पातळीवर सुरू असलेल्या लसीकरणाच्या जोरावर इस्रायल मास्क सक्ती हटवण्याचा निर्णय घेऊ शकला आहे.मास्क वापरण्यासंबंधीचे निर्बंध मंगळवारी रद्द करण्यात आले; पण विमानातून प्रवास करताना आणि क्वारंटाईनमध्ये असताना मास्क लावणे अनिवार्य असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
ज्यांचे लसीकरण अद्याप बाकी आहे, अशा व्यक्तींनासुद्धा आरोग्य केंद्रावर जाताना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इस्रार्यलने आतापर्यंत देशातील ८५ टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण केले आहे.
सुमारे ९० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात सद्य:स्थितीत अवघे २३० सक्रिय रुग्ण असल्याने शाळा आणि व्यवसाय पूर्णपणे सुरू करण्यात आले आहेत; मात्र विविध देशांत सापडत असलेल्या कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या स्वरूपांमुळे इतर देशांतील नागरिकांना प्रवेश देण्याबाबत इस्रायलकडून खबरदारी बाळगली जात आहे. इस्राईलने गत महिन्यात पहिल्या पर्यटकांच्या समूहासाठी देशाचे दरवाजे उघडले होते.
लसीकरण झालेल्या पर्यटकांनाच देशात प्रवेश दिला जात आहे. शिवाय विमानतळावर पर्यटकांची कोरोना चाचणी केली जात आहे.