अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- मंत्री तनपुरेंच्या मतदारसंघातील राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे समुदाय अधिकारी, आरोग्य सेवक नसल्याने आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर गेलेली आहे.
वर्षभरापासून ग्रामपंचायतीवर असलेल्या प्रशासकाचा कारभारदेखील कुचकामी ठरत असल्याने ग्रामस्थांची मोठी हेळसांड होत आहे.
तांदुळवाडी गाव रेल्वेलाईनच्या दोन बाजूला विभागलेले आहे. तांदुळवाडी गाव मांजरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते, तर रेल्वे स्टेशन बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत.
तांदुळवाडी येथील समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवक यांची बदली झाली असून नवीन आरोग्य सेवक अद्याप नियुक्त करण्यात आलेले नाही. तर नवीन समुदाय आरोग्य अधिकारी आजारी रजेवर गेले असल्याचे समजते.
रेल्वे स्टेशन येथील आरोग्य सेवक यांनादेखील बारागाव नांदूर अंर्तगत ड्युटी देण्यात आल्याने ते रेल्वे स्टेशन परिसरात फिरकत नाहीत. त्यामुळे रेल्वे स्टेशन व तांदुळवाडी या दोन आशा सेविका यांच्यावरच आरोग्य व्यवस्थेचे काम सुरू आहे.
दुसऱ्या बाजूला गावचे पोलीस पाटील पद रिक्त आहे. तलाठी यांच्याकडे चार गावांचा पदभार आहे. त्यामुळे त्यांना गावासाठी वेळ देणे शक्य नाही. तसेच गेल्या एक वर्षांपूर्वी तांदुळवाडी गावातून वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी यांची मुदत संपुष्टात येऊन प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.
प्रशासक एक वर्षात गावात फिरकलेदेखील नाहीत, ग्रामविकास अधिकारी प्रशासकाकडे बोट दाखवत असल्याने ग्रामपंचायतमधील अनेक कामे ठप्प झाली आहेत.
गावामध्ये गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आठ-आठ दिवस वाट पाहावी लागत आहे.
रेल्वेस्टेशन येथील भुयारी मार्गाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटल्याने एका वस्तीवरील नागरिकांना गेल्या महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
एक वर्षांपासून सदस्यांची मासिक सभा होत नसल्याने स्वत: ला गावचे मालक समजून प्रशासक, ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरू आहे. कोरोनाचे गावामध्ये रुग्ण वाढत असून गावात कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही.
बाधित रुग्णांचे संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात नाही. अनेक दुकानदार शासनाचे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करत आहेत.