अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- पोलिसांच्या ताब्यातील आरोपी सादिक बिराजदार याचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला. सादिकने पोलिसांच्या गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळेच ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना सादर केला. दरम्यान, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब देशमुख, सहायक फौजदार शेख, पोलिस नाईक पालवे यांना निलंबित केले आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोस्को गुन्ह्यातील आरोपी सादिक हा काही दिवसांपासून फरार होता. मागील आठवड्यात आरोपी सादिक याला पकडण्यासाठी गेले असता, भिंगार जवळील नाल्याजवळ त्यांनी पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
त्यात तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान तो मृत झाला. यासंदर्भात पोलिसांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. तर दुसरीकडे बिराजदार याची पत्नी रुख्सार यांनी जी फिर्याद दिली होती, त्यानुसार देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दोन्ही प्रकरणांची व घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्यानंतर येतील घटनेचा तपास करून प्राथमिक अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी तिघांना निलंबित करण्यात आले.