अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- नेवासा तालुक्यातील वरखेड येथील 8 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून वरखेड
येथील दोघांनी मुलाच्या डोक्यात दगड मारुन जीवे ठार मारल्याची कबुली दिली असून मुलाच्या आईसह तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या अल्पवयीन मुलाचा खून करणाऱ्या वरखेड येथील आई व तिच्या दोन साथीदारांना अटक करून नेवासे पोलिसांनी अशक्य वाटणाऱ्या गुन्ह्याची उकल केली.
५जुलै रोजी रात्री वरखेड येथील अल्पवयीन मुलगा सोहम उत्तम खिलारे, वय ८ या मुलाचा खून झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. संतोष भागीरथ धुंगासे पोलिस पाटील वरखेड यानी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात मृत मुलाची आई सीमा उत्तम खिलारे, वय २७, रा. वरखेड, ता. नेवासे हिस अटक करण्यात आली होती. दोन वेळा तीन दिवसांची पोलिस कस्टडी घेतल्यानंतर व वारंवार आपला जबाब बदलीत या महिलेने पोलिसांना बरेच दिवस त्रास दिला.
अल्पवयीन मुलाचा खुनाबाबत मृत मुलाच्या आईने चौकशी दरम्यान सांगितले की, त्या दिवशी दिवशी प्रांत:विधीचा बहाणा करून खून झालेल्या ठिकाणाकडे जाऊन तिचा प्रियकर आरोपी सुनील किसन माळी व विष्णु हारिभाऊ कुंढारे यांचेशी बोलत होती.
त्या वेळी पाठीमागे आलेल्या मृत मुलगा म्हणाला, मी तुमचे नाव माझ्या वडीलांकडे सांगून देईन. त्यामुळे आरोपी सुनील माळी याने त्यास मारहाण केली. आरोपी सीमा खिलारे हिला देखील मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे ती घरी गेली. नंतर यांनी त्या मुलाच्या डोक्यात दगड मारून जिवे ठार मारले, अशी कबुली दोन्ही आरोपी माळी व कुंधारेनी दिली. या दोन्ही आरोपींना ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणामुळे नेवासे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्याचे आवाहन होते. त्यांनी ते आव्हान पेलले आहे.
पोलिस कस्टडीमध्ये बनावट गुन्हेगार बनवून पाठवलेल्या महिलेशी बोलताना दरम्यान सीमा खिलारेने दिलेल्या कबुलीवरून खरा गुन्हा उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी आता तीनही आरोपींना अटक केले.
यावरून पोलिसांनी डमी गुन्हेगार वापरण्याची युक्ती कामी आल्याचे दिसून येत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे, सहाजक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर, उपनिरीक्षक भारत दाते, उपनिरीक्षक एस. व्ही. भाटेवाल, पोलीस नाईक राहुल यादव, पोलीस नाईक महेश कचे, शाम गुंजाळ, वसीम इनामदार यांनी केली.