अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आता शेतक-यांचा अंत पाहू नये,नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून अद्याप या शेतक-यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई दिलेली नाही.
आता थकीत बिलासाठी शेतक-यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही.भाजप सरकारने पाच वर्षाच्या काळात एकदाही शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत केला नाही तसेच भारनियमन केले नाही, सध्याचे सरकार शेतकरी, महिला एस.टी. कामगार यांच्यासह सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे.
अशी टीका भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी केली. कृषिपंपांच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतीपंपाचा खंडीत केलेला वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महावितरण व राज्य शासन यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज शहरातील गाडगे बाबा चौकात आमदार मोनिकाताई राजळे
यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्यामुळे पोलिसांनी आमदार राजळे यांच्यासह ४१ भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथेही कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
वीज बिल वसुलीसाठी विद्युत वितरण कंपनीने तालुक्यातील शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत केला असून रोहित्रे बंद केली आहेत.त्यामुळे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरु केले,यावेळी कार्यकर्त्यांनी महावितरणचे अधिकारी व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली,
महावितरणचे अधिकारी आंदोलनस्थळी येत त्यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आमदार राजळे यांनीही चर्चा केली,पाच हजार रुपये प्रती रोहित्र वीज बिल भरण्यासाठी तीन हजार व दोन हजार रुपये असे दोन टप्पे पाडून द्यावेत अशी मागणी आमदार राजळे यांनी केली परंतु वरिष्ठ अधिका-यांनी त्यास मान्यता दिली
नाही म्हणून आमदार राजळे व कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या मारला. मोठी लग्न तिथ असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती,म्हणून पोलिसांनी आमदार राजळे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.