अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-आपल्या किर्तनातून समाज प्रबोधन करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या इंदोरीकर , निवृत्ती महाराज देशमुख यांनी कोरोनावर (Covid19) रामबाण उपाय सांगितलाय.
कोरोन काळात हात धुणे, सँनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच आणखी एक उपाय सांगितलाय. मनाचा खंबीरपणा ठेवणे हा देखील रामबाण उपाय असल्याचे इंदोरीकर महाराज म्हणाले.
आज लोणी येथे प्रवरा शिक्षण संस्थेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ते आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या खास शैलातील भाषणातून ‘नागरिकांनो घाबरुन जावू नका’ असं आवाहन केलंय.
लोणी येथे भाजपाचे माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने साडे चारशे बेड्सच्या कोवीड सेंटरची सुरवात झालीय. किर्तनकार इंदोरीकर यांच्याहस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
आताच्या कोरोनाच्या काळात अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत. अशिक्षीत, सुशिक्षीत सर्वांनी कोरोनाचा धसका घेतलाय. त्यामुळे अनेकांना मृत्यू समोर दिसतोय. मात्र काळजी करत राहू नये असे इंदोरीकर महाराज म्हणाले.
आजपर्यंत अनेक अवतार झालेत. मात्र माणसातील माणुसकी काय आहे ? हे दाखविण्यासाठी कोरोनाला याव लागलंय असे ते म्हणाले. तुमच्याबद्दल कोणाला किती आपलुकी आहे ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पॉझीटीव्ह व्हावं लागतंय असे निवृत्ती महाराज देशमुख म्हणाले.
मला कोरोना होणारच नाही असं म्हणण्यापेक्षा मी मला कोरोना होवू देणार नाही असं म्हणायला हवं. मला अनेक उद्घाटनाला बोववलं जातं त्यावेळी असे आणखी व्यवसाय सुरु होतील असं म्हणत असतो.
मात्र कोरोना सेंटरच्या उद्घाटनानंतर मला येथे दाखल होण्याची वेळ येवु नये. म्हणजेच दुसर कोरोना सेंटर सुरु करण्याची वेळ येवू नये असे इंदोरीकर महाराज म्हणाले.
सध्या तुम्ही पॉझिटीव्ह झाला की जगातुन निगेटिव्ह होता. तुमच्याकडे किती पैसा आहे ? हे महत्वाचं नसून शेवटी रडायला कोणी नसत आणि जाळायला पंधराशे रुपये रोजाची माणसे आज आणावी लागतायत असेही ते म्हणाले.