ताज्या बातम्या

रेशनकार्डातुन ‘ही’ वस्तू झाली कायमची हद्दपार सर्वसामान्य झाले हैराण!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- शासनाने उज्ज्वला गॅस वाटप करून गरिबांच्या रेशन कार्डावरून केरोसीन कायमस्वरुपी हद्दपार केल्याने, केरोसीनसाठी ग्रामीण जनता वणवण भटकत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील जनतेला महिन्याला किमान पाच लिटर केरोसीन देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या ग्रामीण भागात केरोसीन मिळणे दुरापास्त झाले आहे.

त्यातच विजेचे भारनियमन, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, यामुळे गाव खेड्यांत रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत घरोघरी वीजपुरवठा करण्यात आला असल्याने केरोसीनचे दिवे बंद झाले.

मात्र, दरमहा येणाऱ्या भरमसाठ वीजबिलाने गरिबांचे कंबरडे मोडले आहे. हातावर पोट असणाऱ्यांना संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले आहे. वीज कंपनी थकित वीज देयकासाठी वीजपुरवठा खंडित करते.

त्यामुळे अनेकांच्या घरातील उजेड नाहिसा झाला आहे. त्यांच्याकडे केरोसीन नसल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. शासनाने घरोघरी उज्ज्वला गॅसचा मोफत पुरवठा केला.

धूरमुक्त घर करणे व जंगलाची होणारी तोड कमी करण्यासाठी शासन प्रयनशील आहे. मात्र, गॅस पुरवठा केल्यानंतर कुटुंबाच्या शिधापत्रिकेतून केरोसीन कमी करण्याचा नियम असल्याने

बहुतेक शिधापत्रिकेतून केरोसीन कायमचे हद्दपार झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात केरोसीनचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे घरात गॅस उपलब्ध झाल्याने घरातील अंधार नाहिसा होण्याऐवजी दुसरीकडे घरात अंधारच पसरताना दिसून येत आहे.

Ahmednagarlive24 Office