अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील किल्ल्यावर देशातील नव्हे तर जगातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकवणार असल्याचा मानस कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी केला आहे.
लहानपणापासून आपण सगळेच मंदिरं, गडकिल्ल्यांना भेट देतो. मंदिरं, गडकिल्ल्यांवर आपल्याला भगवं निशाण फडकताना दिसतं. तिथं फडकणाऱ्या भगवा झेंड्याकडे पाहिल्यावर मला नेहमीच प्रेरणा आणि शक्ती मिळते. आणि मला विश्वास आहे हा अनुभव तुम्हालाही आला असेल.
आपल्याकडच्या अनेक महत्त्वाच्या सण समारंभातही भगव्याला विशेष महत्त्व आहे असं रोहित पवार म्हणाले. देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणी हा ध्वज फिरवला जाईल. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल, असे पवार यांनी जाहीर केले.
हा ध्वज तयार झाला असून त्याचे संत-महंताच्या हस्ते पूजन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. याच किल्ल्याच्या कातळांनी एकेकाळच्या निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे.
त्यामुळे या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचे प्रतीक म्हणून ७४ मीटरचा जगातील सर्वात मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला हा ध्वज फिरवला जाईल. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल.
अशी आहेत वैशिष्टे? :- तब्बल १८ टन वजन असलेल्या खांबावर ९० किलो वजनाचा आणि ९६x६४ फूट अशा भव्य-दिव्य आकाराचा हा स्वराज्य ध्वज आकाशाला गवसणी घालणाऱ्या ७४ मीटर उंचीवर डौलाने फडकणार आहे.
या गौरवशाली स्वराज्य ध्वजाचा प्रवास आता पुढील दोन महिने लोकसहभागातून महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख ७४ अध्यात्मिक, धार्मिक स्थळी, संतपीठं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले या शक्तीपीठांच्या ठिकाणी तसंच श्रीराम मंदिर (अयोध्या),
मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), शाहू-फुले-आंबेडकरांच्या स्मारकाच्या ठिकाणी, वर्ध्यात महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम आदी ठिकाणी नेऊन तिथं पूजन केली जाईल.
शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात या ध्वजाची पूजा केल्यानंतर खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यासमोर या स्वराज्य ध्वजाची मान्यवरांच्या उपस्थितीत १५ ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठापना केली जाणार आहे.