Maharashtra politics :केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची ओळख असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. त्यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र यावर सावध भूमिका घेतली आहे. स्वत: राज ठाकरे यांनी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय कार्यकर्त्यांनाही त्यांनी तूर्त काहीही न बोलण्याचा आदेश दिला आहे.
राज ठाकरे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये.
मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन. या विषयावर राज यांची प्रतिक्रिया महत्वाची मानली जाते. एक तर ठाकरे यांचे भाऊ म्हणून आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज यांची राजकीय जडणघडण झाल्याने या विषयावर ते काय बोलणार?
उद्धव आणि मूळ शिवसेनेला पूरक बोलणार की तेही ठाकरे यांनाच दोष देणार? याकडे लक्ष लागले आहे. मात्र, राज यांनी सध्या तरी थांबा आणि पहा असेच धोरण घेतल्याचे दिसून येते. प्रतिक्रिया देण्यास घाई न करण्याच्या त्यांच्या या निर्णयाचे वेगळे अर्थही लावले जाऊ लागले आहेत.