अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॅालनीतील श्री. कोठारी यांच्या घराच्या गच्चीवर उदमांजर/उदबिल्ला आढळुन आला. त्यांच्या घरी काम करणार्या कामवाल्या बाईने भीतीने घाबरून उदमांजरला मारण्यासाठी लोकांना बोलावले.
जमा झालेले लोकं काठ्या व बांबु घेवुन उदमांजर मारत आहेत हे समजल्यावर प्राणीप्रेमी सचिन धायगुडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवुन मारणार्या लोकांना रोखले. उदमांजर घरावर अंथरलेल्या ताडपत्री खाली शिरले होते. त्यावेळी धायगुडे यांनी त्याला शिताफीने पकडले.
उदमांजर सुरक्षितरित्या परत शेतात निघुन गेल्यावर सचिन धायगुडे यांनी उपस्थितांना हा प्राणी निरूपद्रवी असुन त्यांचे या प्राण्याविषयी असणारे गैरसमज दुर केले व परत हा प्राणी कुठे आढळल्यास त्याला मारू नये ही विनंती केली. उपस्थितांनीही या विनंतीला होकार दर्शवला.
उदमांजर हा प्राणी पुर्ण भारतभरा सह इतरही आशियाई देशांमधे आढळतो. त्याला इंग्रजीत “एशियन पाम सिवेट” तर स्थानिक भाषेत उदबिल्ला, म्हसण्याउद, उद असे म्हणतात. लांबलचक शरीर असणारया उदमांजराची डोके ते शरीर लांबी ५३ सेमी पर्यंत असते व त्याच्या शेपटीची लांबी ४८ सेमी असते.
उदमांजराच्या अंगावर काळसर व राखाडी केस असतात. उदमांजराचे वजन साधारणपणे ३ ते ५ किलो असते. उदमांजर हा निशाचर प्राणी असुन तो मानवी वस्तीजवळ व जंगलांमधे ही आढळतो. सहसा दिवसभर झाडांवरील ढोलींमधे आराम करून रात्रीच्यावेळी हा प्राणी खाद्याच्या शोधात फिरतो.
उदमांजर हा सर्वहारी प्राणी असुन त्याच्या आहारात शाकाहार व मांसाहार या दोन्हींचा समावेश असतो. फळे, किटक, बेडूक, सरडे, उंदिर, खेकडे इत्यादींचा त्याच्या आहारात समावेश असतो.
विशेष बाब म्हणजे इंडोनेशियामधे या उदमांजराने कॅाफीची फळं खाल्ल्यानंतर त्याच्या विष्ठेतुन मिळणार्या बियांपासुन जगातली सर्वात महागडी सिवेट कॅाफी तयार केली जाते.
अशी माहिती सचिन धायगुडे यांनी दिली. एकीकडे शेतकरयांचा मित्र असलेल्या उदमांजराविषयी आपल्या समाजात प्रचंड गैरसमज असुन या गैरसमजांमुळे लोकं उदमांजराला घाबरतात व त्याच्या जिवावर उठतात.
उदमांजर पुरलेले प्रेत उकरून खातो खासकरून लहान मुलांचे प्रेत, उदमांजर लहान मुलांवर हल्ला करते असे गैरसमज असल्यामुळे हकनाक हा निरूपद्रवी प्राणी मारला जातो. मुळात हा प्राणी प्रेत उकरून खात नाही व लहान मुलांवरही हल्ला करत नाही.
आपण सर्वांनी हे गैरसमज दुर केले पाहीजे. परिसरात वन्यजीव आढळल्यास ८०५५९०९१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राणीमित्र सचिन धायगुडे यांनी यावेळी केले.