अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना पालिकेने आता घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
गतवर्षांप्रमाणेच यंदाही अनके निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने यंदाचा गणेशोत्सव देखील नियम व बंधनांमध्ये साजरा करावा लागणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी साधेपणाने व खबरदारी घेतच उत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना
घरगुती बाप्पाचे आगमनाला मिरवणुकीच्या स्वरूप नसावे. आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ लोकांनी जावे. आगमनासाठी जाणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झालेले असावे. तसेच घरगुती उत्सवासाठी बाप्पाची मूर्ती २ फुटांपेक्षा जास्त नसावी.
यंदा घरगुती गणेशोत्सवासाठी पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे/कुटुंबियांचे कोरोनापासून संरक्षण होईल.
घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे.
गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे.
तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे
घरगुती बाप्पाचे विसर्जन साधेपणाने करावे. त्यासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्ती असाव्यात व या व्यक्तींचे लसीकरण झालेले असावे.
घरगुती गणेशमूर्तीचं विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेऊ नयेत.
विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे . विसर्जन प्रसंगी मास्क, कोरोनाच्या नियमावली आदीचे पालन करावे.
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.
विसर्जनादरम्यान सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापरणे यांसारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
सील केलेल्या इमारतींमधील गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी घरीच व्यवस्था करावयाची आहे.
घर/इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.