अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-भारताने कोरोना महामारी आटोक्यात आल्याचा गैरसमज करून घेतला आणि फार आधीच लॉकडाऊन हटवला. परिणामत: हा देश दुसऱ्या लाटेच्या या गंभीर संकटात अडकला, असे मत अमेरिकेचे राष्ट्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी व्यक्त केले.
फॉसी यांनी यापूर्वीच कोरोनाच्या या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारताला पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन लावण्याची आणि अधिकाधिक प्रमाणात लसीकरण करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.
अमेरिकन संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सीनेटच्या आरोग्य, शिक्षण, श्रम व पेन्शन समितीसमोर मंगळवारी कोरोना परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी डॉ. फॉसी यांनी अमेरिकेसह इतर देशांमधील कोरोना परिस्थितीवर आपले मत मांडले.
भारतात खरे तर मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाचा संसर्ग होत होता. परंतु आपण कोरोनावर विजय मिळवल्याचा गैरसमज या देशाने करून घेतला. त्यांनी फार आधीच लॉकडाऊन हटवून निर्बंध शिथिल केले. याचे परिणाम आपण बघतच आहोत.
या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे, असे फॉसी म्हणाले. भारतातील कोरोना प्रकोपापासून अमेरिका काय धडा घेऊ शकतो, असा प्रश्न फॉसी यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी परिस्थितीला कधीही कमी लेखू नका, असे उत्तर दिले.
सर्वप्रथम परिस्थिती आपल्या नियंत्रणात असल्याचा गैरसमज कधीही करून घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे भविष्यातील महामारींचा सामना करण्यासाठी आपल्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची तयारी करण्याची गरज आहे,असे फॉसी म्हणाले.
जागतिक महामारीविरोधात जागतिक समुदायाने एकजुटीने लढण्याची गरजही फॉसी यांनी व्यक्त केली. प्रत्येकाला आपली जबाबदारी ओळखावी लागेल.
आपल्याला एकमेकांच्या सोबतीने लढावे लागेल. त्यातही प्रामुख्याने लसींच्या बाबतीत आपल्याला एकजूट दाखवावी लागेल. या जगात कुठेही विषाणूचा प्रकोप सुरू असला तर अमेरिकेला देखील त्याचा धोका आहे, हे लक्षात ठेवा.
भारतातील परिस्थितीवरून आपण हा धडा घ्यायला हवा, असे फॉसी म्हणाले. डॉ. अँथनी फॉसी हे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे वैद्यकीय सल्लागार असून नॅशनल इ्स्टिटट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इंफेक्शस डिसिजेसचे संचालक आहेत.