अहमदनगर जिल्ह्यातील हा तालुका झाला कोरोनाचा हॉटस्पाॅट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नगर शहरात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटली असताना पारनेर कोरोनाचे नवे हॉटस्पॉट झाले आहे. ११ दिवसानंतर ही या तालुक्यांत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आलेली नाही.

पारनेरमध्ये मंगळवारी सर्वाधिक १३६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर नगर जिल्ह्यात दिवसभरात ६३५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे पारनेरसह ग्रामीण भागाचा धोका वाढू लागला आहे. दरम्यान, पारनेरमध्ये वेगळ्या ट्रेंडची लक्षणे आढळून येतात की काय यासाठी तपासण्या करून त्याचा अहवाल प्रयोगशाळेला पाठवला होता.

तो अहवाल राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला थेट प्राप्त होणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाला याबाबत अद्याप अहवाल मिळाला नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले. पारनेरपाठोपाठ कर्जत, शेवगाव या तालुक्यातही पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे.

उर्वरित तालुक्यांत मात्र दिवसभरात ३५ पेक्षा कमी रुग्ण आढळून आले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२२ आणि अँटीजेन चाचणीत ३६८ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले १, जामखेड १, नगर तालुका ६, नेवासा ३, पारनेर १, पाथर्डी १३, राहुरी ४, श्रीगोंदे २, श्रीरामपूर १ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या आकडेवारीचा घोळ कायम आहे. १२ जुलैला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यादीत ३ हजार ७८६ ॲक्टिव्ह रुग्ण दाखवण्यात आले तर जिल्हा प्रशासनाच्या यादीत २ हजार ७०७ ॲक्टिव रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24