अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची संकल्पना जनसामान्यांना भावली. त्यामुळे विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. सर्वप्रथम जाधववाडीने बिनविरोध निवडणुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायत बिनविरोध केली.
तेथील विविध विकासकामांसाठी ३१ लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने विकास कामांसाठी निधी कमी पडणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जाधववाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण आमदार लंके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे होते.
सरपंच विठ्ठल जाधव, एस. आर. राऊत, रामदास राऊत, राजेंद्र राऊत, भाऊसाहेब राऊत, प्रशांत राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार लंके म्हणाले, जाधववाडी हे माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या विचारांवर चालणारे गाव असल्याने येथील ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली. प्रास्ताविक भगवान राऊत यांनी केले, तर आभार बाबाजी राऊत यांनी मानले.
बिनविरोध निवडणुकीची सर्वाधिक भीती प्रस्थापित पुढाऱ्यांना वाटली. आपले राजकारण यामुळे संपणार तर नाही ना, अशी शक्यता त्यांना वाटली. त्यामुळे त्यांनी बिनविरोध निवडणुकीच्या संकल्पनेला विरोध केला.
मात्र, गावातील एकोपा टिकवून राहण्यासाठी व विकासकामे होण्यासाठी बिनविरोधचा पर्याय हा योग्यच होता हे स्पष्ट झाले आहे.- राहुल झावरे, माजी सभापती.