अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात पोलीस अधिकारी अनुप डांगे आणि बी. आर. घाडगे यांनी तक्रारी केल्यानंतर आता तिघा क्रिकेट बुकींनी परमबीर सिंह यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
परमबीर सिंह यांनी आपल्याकडून जवळपास ३ कोटी ४५ लाख रुपये उकळल्याचा आरोप क्रिकेट बुकी सोनू जालान याने केला आहे.
यापूर्वी सट्टेबाजीच्या प्रकरणांमध्ये सोनूला अटक झाली होती. सोनू जालानने गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे.२०१८ मध्ये परमबीर सिंह यांनी माझ्यावर मोक्का लावून ३ कोटी ४५ लाख रुपयांची खंडणी वसूल केली.
याशिवाय तत्कालीन ठाण्यातील माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि राजेंद्र कोथमिरे यांच्यावरही क्रिकेट बुकी सोनू जालानने आरोप केले.
या प्रकरणाची दखल गृहखात्याने तत्काळ घेतली असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य गुप्तवार्ता विभागाला देण्यात आले आहेत.
सोनू जालानसोबतच केतन टन्ना, मुनीर खान अशा अनेकांनी परमबीर सिंह यांच्यावर कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात आम्ही दोषी ठरलो तर आमच्यावरही कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी तक्रार पत्रात म्हटले आहे.