अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देवरे यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने दिले.
मात्र प्रत्यक्षात देवरे यांच्या समवेत काम करणारे त्यांच्या हाताखालील कर्मचारीच आता देवरे यांच्या विरोधात उभे राहीले आहेत.
पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटना तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना व मुख्य सचिवांना निवेदन दिले होते.
दोन दिवसांपूर्वी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही मागणीचे निवेदन दिले होते. या निवेदनातून तहसीलदार देवरे यांची बदली करा अथवा आमच्या सर्वांच्या पारनेर तालुक्यातून बदल्या करा अशी मागणी करण्यात आली.
मागणी पूर्ण होत नसल्याने पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकाऱ्यांनी देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार ठप्प झाला आहे. तहसील कार्यालयाच्या दारातच बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झाले आहे.