अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- बसस्थानकावर महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या राहुरी तालुक्यातील दोन महिलांना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले.या महिलांकडून अडीच लाख रुपये किंमतीचे ४२ ग्रॅम वजनाचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
ज्योती मधुकर रोकडे व आशाबाई मधुकर रोकडे अशी अटक केलेल्या त्या महिलांची नावे आहेत. याबाबत सविस्तर असे की, दि.४ जानेवारी रोजी श्रीगोंदा बसस्थानकावर श्रीगोंदा जामखेड बसमध्ये चढताना सविता क्षीरसागर या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.
या चोरीबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास करत असताना बसस्थानकावरील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांचे पथक बसस्थानकात पेट्रोलिंग करत होते.
या दरम्यान त्यांना दि.९फेब्रुवारी रोजी दोन संशयित महिला गर्दीत महिलांच्या पर्स चाचपताना दिसल्या, त्यामुळे पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या महिलांकडून अडीच लाख रूपये किंमतीचे ४२ ग्रॅम वजनाचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.