ज्यांना लस मिळणार त्यांना जाणार फोन; गर्दी टाळण्यासाठी…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील लसीकरण केंद्रावर उपलब्ध होणारे कमी लसीचे डोस आणि लस घेण्यासाठी केंद्रावर होणारी भरमसाठ गर्दी कोरोना वाढीला कारणीभूत ठरू शकते म्हणून प्रांताधिकारी अनिल पवार आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांनी गर्दी होऊ नये म्हणून नियोजन केले.

ज्यांना लस मिळणार त्यांना फोन करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी न होता गर्दी टाळता येणार आहे. सध्या कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी उसळत आहे.

उपलब्ध होणारे डोस कमी असतात. मात्र लोक रात्री मुक्कामी येऊन रांगा लावतात. शिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांवर राजकीय दबावही येत असतो.

ही गर्दी कोरोना वाढीला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांनी यावर इतर तालुक्यालाही मार्गदर्शक ठरेल, असे नियोजन केले आहे.

यामध्ये प्रत्येक गावातील तलाठी व ग्रामसेवक यांनी विधानसभा मतदार यादीनुसार गावातील १८ ते ४४ व वय ४५ च्या वरील दोन उतरत्या वयानुसार वेगवेगळ्या याद्या तयार केल्या आहेत.

आता सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस दिला जात आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील यादीनुसार ज्यांचे लसीकरण झाले, त्यांच्या नावापुढे खून करायची आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जेवढी गावे आहेत. उपलब्ध लसीनुसार क्रमाने एकेक गावातील जास्त वयाच्या प्राधान्याने यादीनुसार तेवढ्याच नागरिकांना फोन करायचा आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी तेवढेच लोक केंद्रावर उपस्थित राहतील.

त्यामुळे आज कोणाला लस मिळणार आहे ते त्यांना कळेल. गर्दीही होणार नाही व नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागणार नाही. या नियोजनाने कोरोना वाढीला ब्रेक लागेल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24