अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- संघटनेचा नेता व कार्यकर्त्यांनी एकाच विचाराने प्रेरित होऊन नाभिक समाजाचा सर्वांगिण विकास या उद्देशासाठी एकत्र येऊन लढा दिला तरच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय अस्तित्व टिकेल. आपल्या ध्येयाशी इमान राखणारे खरे शिलेदार संघटनेचा प्राण असतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय नाभिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण जाधव यांनी केले.
नाभिक समाजातील प्रलंबित प्रश्नांबाबत, विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय नाभिक समाज संघटनेची बैठक नगर येथे पार पडली. यावेळी राज्यातील मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री.जाधव बोलत होते. या बैठकीला उद्योजक व समाजभुषण पुरस्कार प्राप्त बाबासाहेब कुटे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक औटी, सचिव महेंद्र जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष सुधीर गाडेकर,
सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष किरण भागे, ठाणे जिल्हाध्यक्ष भरत राऊत, प्रदेश प्रवक्ते अजित महाराज खंडागळे, अतुल माने आदि उपस्थित होते. श्री.जाधव पुढे म्हणाले, आपल्या समाजाच्या आर्थिक उन्नत्तीबरोबरच सोर्स ते रिसोर्स अंतर्गत आपल्या सलून व्यवसायाबरोबरच उपलब्ध जागेत विविध व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. युवक-युवतींनी यामध्ये सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा,
एक यशस्वी उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. बाबासाहेब कुटे यांनी समाजाचे प्रश्न आहेत, तसेच आहेत ते सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरावर प्रयत्नांबरोबरच कायम पाठपुरावा करावा. आरक्षणासह केश शिल्पी बोर्ड, प्रतापगडावरील स्मारकाचा प्रश्न यासाठी समन्वय साधून समाज उन्नत्तीसाठी मी स्वत: आपल्या बरोबर आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
अशोक औटी यांनी सलून व्यवसायात होणारी घट, वाढत चालेला कर्जाचा डोंगर याबाबत चिंता व्यक्त करुन या बाबत राज्यभर फिरुन सर्वसामान्य सलून व्यावसायिकांना धीर देण्यासाठी प्रयत्न करणार, आत्महत्या करु नका या मानसिकतेबद्दल प्रबोधन करुन सर्वांचे मनोबल व धैर्य उंचवण्यासाठी राष्ट्रीय नाभिक संघटना सर्वोतोपरि प्रयत्न करीन असे सांगितले. यावेळी महेंद्र जाधव, अजित खंडागळे,
सुधीर गाडेकर, किरण भागे, भरत राऊत, अतुल माने, आदिंनी मनोगते व्यक्त केली. कोणताही प्रश्न, समाजातील अन्याय दूर करण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही. संघटन मजबूत असेल तर कार्यकर्त्यांची महत्वकांक्षा वाटते. आपल्यामुळे संघटना आहे, असा अभिमान न बाळगता आपण संघटनेमुळे आहोत ही भावना प्रत्येकाने ठेवावी,
असे मत या सर्वांनी व्यक्त केले. नगर येथील बैठकीनंतर मराठवाडा भागात दौरा करणार असून, अन्यायग्रस्त, आत्महत्याग्रस्त कुटूंबातील व्यक्तींना भेटून त्यांचे दु:ख समजून घेवून दिलासा देण्याचे काम करणार असल्याचे शेवटी अशोक औटी यांनी आभार प्रदर्शनात स्पष्ट केले.