७ जानेवारी २०२५ मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या आहेत.त्यामुळे त्या घटनांची पाळेमुळे खणून काढावीत,अशी मागणी सर्वपक्षीय स्थानिक आमदार-खासदार करत आहेत.
अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याने अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता आहे.सार्वजनिक मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या लोकप्रतिनिधींसह इतर सन्माननीय व्यक्ती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेविरुद्ध आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ नये यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी,तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्य शासनामार्फत पुरवण्यात यावे,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
त्यात पवार यांनी म्हटले आहे की,मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही गुंडांनी अपहरण करून निघृण हत्या केली.गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तत्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्रात आंदोलने उभी राहिली आहेत.फरार आरोपींना व त्यामागील सूत्रधारांना तत्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे,अशी एकमुखाने मागणी करण्यात आली.