अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली तर इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. हा प्रकार नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे घडला आहे.
पोलिसांनी सागर संतोष गायकवाड (वय 25) रा. झापवाडी रोड घोडेगाव, रमेश केशव जाधव (वय 23) रा.रामनगर बिडकीन ता.पैठण व विकी पोपट जाधव (वय 27) रा. सलामपुरानगर पंढरपूर ता. जि.औरंगाबाद यांना अटक केली तर इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अमळनेर येथील चौकात टाकलेल्या छाप्यात ओमनी कार व त्या जवळ पाच संशयित इसम आढळून आले.
पोलिसांची चाहूल लागल्याने त्यांनी घटनास्थळाहून पलायन केले. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यातील तीन व्यक्तींना शस्रासह पकडले.
पकडलेल्या आरोपी कडून मिरचीची पुड, लोखंडी गज, सुरा, लाकडी दांडा, 1000 रूपये किमतीचा मोबाईल फोन व एक लाख रूपये किमतीची मारूती
ओमनी कार (एमएच 13 एन 6468) असा एकूण एक लाख एकहजार रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.