अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या अनुषंगाने यंदा ही कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव रद्द करण्यात येत असून दि ३, ४ आणि ५ ऑगष्ट रोजी कर्जत शहरात कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल. यासह कर्जत शहरात येणारे सर्व रस्ते नाकाबंदी करून या चेकपोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल.
तरी सर्वसामान्य नागरिकांनी या काळात प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले. दि ४ ऑगस्ट बुधवार रोजी कामिका एकादशी दिवशी कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांची मोठी यात्रा कर्जत शहरात भरते.
मात्र यंदा देखील कोरोना पार्श्वभूमीवर व कर्जत शहर आणि तालुक्यातील वाढते कोरोना रुग्णाची संख्या पाहता संत सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव सर्वांच्या सहमतीने आणि शासनाच्या नियमानुसार रद्द करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव रद्द करण्यात आला असून, याबाबत नियोजन करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा शांतता बैठक पंचायत समितीत संपन्न झाली.
यावेळी बुधवारी संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात परंपरे अनुसार अभिषेक आणि पुजा, मोजक्याच पुजारी आणि सेवेकरी यांच्या हस्ते पार पडेल, अशी माहिती यात्रा कमिटीच्या सदस्यांनी तालुका प्रशासनास दिली.