अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- कोल्हार भागवतीपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून थंडाववलेले चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी येथील सुरेश रामनाथ निबे यांचे एमआरएफ टायर शोरूमचे शटर तोडून सुमारे ३ लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल चोरल्याची घटना घडली.
सदर दुकानात सलग तिसऱ्या वेळेस चोरीची घटना घडली. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सदर शोरूमच्या शटर खालील फरशी काढली. त्यानंतर कुलूप तोडण्याऐवजी शटर थेट कटावणीच्या साहाय्याने उभे तोडले.
चोरीपूर्वी येथील सीसीटीव्हीचे कनेक्शन आधी तोडून आपण केमेरात दिसणार नाही याची काळजी चोरट्यांनी घेतली. दुकानातील महागडे असलेले टायर टेम्पोत टाकून चोरटे पसार झाले.
या घटनेची माहिती लोणी पोलिसांना अवघ्या काही वेळातच समजल्याने कोल्हार पोलिस औट पोस्टला नियुक्त असलेले सहाय्य फौजदार बाबासाहेब लबडे व पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी यांनी घटना स्थळी धाव घेतली.
तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. मध्यरात्री सदर दुकानाचे चालक सुरेश आर. निबे यांना घरून पोलिसांनी दुकानात आणल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. घटनेनंतर लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी तातडीने दाखल झाले.
त्यानंतर नगरहून ठसे तज्ञ व श्वान यांना पाचारण करण्यात आले. सदर शोरूममध्ये सलग तिसऱ्या वेळी चोरीची घटना घडली. मागील कुठल्याही चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही.
मात्र सध्या नियुक्त असलेले लोणी पोलिस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील व पीएसआय नानासाहेब यांनी अनेक गुन्ह्यची उकल अल्पावधीत केली असल्याने सदर चोरीचा तपास होऊन चोरटे गजाआड होतील, असा आशावाद सदर दुकांचे चालक सुरेश निबे यांनी केला.
या चोरीनंतर चोरट्यांनी जणू कोल्हार भगवतीपूरकरांना इशाराच दिला. आधीच कोरोना महामारीने आर्थिक चक्रात अडकलेल्या व्यापारी वर्गात मात्र यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. लोणी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करून तपास सुरू केला.
लोणी पोलिसात ३ लाख १९ हजार रुपयांचा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत.