अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोना पाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यात म्युकोरमायकॉसिस आजाराने थैमान घातले आहे १८० रूग्णांची नोंद झाली आहे.यातील ४ रुग्नांचा मृत्यू झाला आहे.
करोना संसर्गापाठोपाठ म्युकोरमायकॉसिस आजाराने नगर जिल्ह्यात डोके वर काढले आहे. करोना रूग्णसंख्या कमी होत असली तरी आता म्युकोरमायकॉसिस आजाराचे रूग्ण वाढत आहे.
शहरातील खाजगी रुग्णालयांकडून महापालिकेने म्युकोरमायकॉसिस आजारावर उपचार घेणार्यांची माहिती घेतली जात आहे.आतापर्यंत म्युकरमायकोसीसचे १८० रुग्ण आढळले असून त्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली आहे.
कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत ‘म्युकोरमायकोसिस’ हे ‘फंगल इन्फेक्शन’ आढळत आहे. ते नवीन नाही; परंतु हल्ली कोरोनामुळे प्रतिकारशक्ती तसेच उपचारादरम्यान स्टिरॉईड्सचा मारा यामुळे अनियंत्रित मधुमेहातील रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार वाढत आहे.
फंगल इन्फेक्शन’मुळे काही रुग्णांची दृष्टी कमकुवत झाली. काहींमध्ये नाक आणि जबड्याचे हाड काढून टाकावे लागण्याचीही भीती आहे. ‘म्युकोरमायकोसिस’मुळे काही रुग्णांना मृत्यूचा धोकाही वाढताना दिसत आहे.
तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोळ्याच्या बाजूला सूज, डोकेदुखी, नाकाला सूज, सायनस रक्तसंचय अशी लक्षणे दिसून येत आहेत. काळ्या बुरशीचे रुग्ण गेल्या अनेक दिवसांपासून आढळत असले तरी त्यांची नेमकी माहिती संकलित केली जात नव्हती.खासगी रुग्णालयांत रुग्ण परस्पर दाखल होत होते. मात्र, त्यावरील उपचारासाठी लागणारी औषधे प्रशासनाकडून नियंत्रित करण्यात आली आहेत.
याशिवाय त्यांची माहितीही देण्याचे बंधन कडक करण्यात आल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांकडून प्रशासनाकडे नेमकी माहिती उपलब्ध होऊ लागली आहे.
दरम्यान राज्यभरात अशा रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहेत. अशा वेळी रूग्णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहेत.