शिवसेनेची सत्ता व मुख्यमंत्री असूनही शिवसैनिकांवर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-  राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन पक्षाची महाआघाडी असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा धुरा सांभाळत आहे. शिवसेनेची सत्ता व मुख्यमंत्री असूनही नगरच्या शिवसैनिकांवर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकप्रकारे घरचाच आहेर मिळाला.

अचानक खंडीत केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नगर तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक झाले. आक्रमक शिवसैनिकांनी वीज वितरण कंपनीच्या नगर कार्यालयाचे मुख्य गेटच बंद केले. तद्नंतर मात्र सूत्रे वेगाने फिरली. शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी या प्रश्नी उर्जाराज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे तत्काळ लक्ष वेधले. ना. तनपुरे यांच्या आदेशामुळे नगर तालुक्यातील अनेक गावांचा खंडीत केेलेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला.

वीज बीलापोटी वीज वितरण कंपनीकडून सध्या ट्रान्सफार्मरच बंद करण्याचा सपाटा सुरू आहे. नगर तालुक्यातील उक्कडगाव, नारायणडोह, निंबोडी, डोंगरगण, वाळुंजसह इतर गावातील ट्रान्सफार्मर वीज बीलापोटी बंद करण्यात आले. अचानक वीजपुरवठा खंडीत केल्याने शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या. सध्या रब्बीच्या पिकांना विहिरीतील पाणी देण्यासाठी विजेची नितांत गरज आहे.

अशा परिस्थितीतच वीज पुरवठा खंडीत केल्याने शेतकऱ्यांमध्ये उद्रेक झाला. शेतकऱ्यांनी थेट वीज वितरण कंपनीचे नगरचे कार्यालय गाठले. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोर, सावंत गुरुजी, पोपट शेळके, बाळासाहेब जायभाय, बाळासाहेब म्हस्के, संजय पटारे, प्रकाश पोटे आदी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. विशेष म्हणजे आंदोलन करूनही शेतकऱ्यांनी वीज बीले भरण्यास तयारी दर्शविली.

अहमदनगर लाईव्ह 24