अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- देवळाली प्रवरा येथील खाजगी कोविड सेंटर मधील कोट्यावधी रुपयांच्या गैरकारभराची चौकशीची मागणी व तेथील तज्ञ डॉक्टरच्या प्रमाणपत्राबद्दल केलेल्या वक्तव्याचा राहुरी येथील निमा संघटनेने निषेध व्यक्त करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केले बद्दल आमचे प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की, गरीब जनतेसाठी वेळ प्रसंगी आम्ही तुरुंगामध्ये सुद्धा जाऊ.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, देवळाली प्रवरा नगरपालिका आणि नगरपालिकेच्या इमारती मध्ये सुरू असलेले खाजगी डेडिकेटेड कोविड सेंटर यांनी संगनमताने करोडो रुपयांचा गैरकारभार केला असल्याने कागदावर नसलेले हे कोविड सेंटर चालक आता निमा संघटनेच्या आडून आमची बदनामी करून मुख्य विषयाला बगल देऊ पहात आहेत.
कोणत्याही डॉक्टर बद्दल आमच्या मनात आकस नाही. आमची लढाई ही देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेत कर भरणारे नागरिक व या खाजगी कोविड सेंटर मध्ये आर्थिक लूट झालेल्या जनतेसाठी आहे. कोरोनामुळे लोकांची उत्पन्नाची साधने बंद आहेत, हाताला काम नाही, अश्या अवस्थेत पैशा अभावी रुग्णांना दारोदार भटकण्याची वेळ आली आहे.
मुळात हे कोवीड सेंटर नगराध्यक्षच चालवत होते असा समज होता. तसे नगरपरिषदेचे दैनंदिन कामे सोडुन चोवीस तास तिथे बसुन जातीने ते लक्ष देत होते. त्यातुन नगरपरिषदेच्या सहाय्याने शहरवासीयांना अल्प दरात सेवा देत असल्याचा दावा करत होते.
परंतु रुग्णांची लाखाच्या घरात बिले येवु लागली, रुग्ण तक्रार करु लागली, माझ्याकडे संपर्क करु लागली, त्यामुळे नगरपरिषदेकडे आम्ही माहितीच्या अधिकाराने याबाबत माहिती मागवली. तेंव्हा हे कोवीड सेंटर नगराध्यक्ष कुणाचेतरी नावाने चालवत असल्याची बाब उघड झाली.
आता आपल्यावर येणारे चौकशीचे बालंट डाॅक्टर लोकांवर ढकलुन नामानिराळे रहाण्याचा हा केविलवाणा प्रयत्न निमा संघटनेने ध्यानात घ्यावा अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे. आमचा लढा नगराध्यक्ष व त्यांचे लांगलुचन करणा-या टोळीने गावातील नागरिकांची केलेल्या लुटमार प्रवृत्तीच्या विरुध्द आहे.
हि प्रवृती निमासारखी संघटनाही सहन करणार नाही. उगाच काहीतरी तांत्रिक मुद्दा काढुन षड्यंत्र करणा-या या छुप्या प्रवृतीला संरक्षण देण्यापेक्षा निमा संघटनेने माझ्या लोकोपयोगी लढ्याला समर्थन द्यावे. मी निमा संघटनेशी याबाबत कोठेहि कधीहि चर्चा करण्यास तयार आहे.
माझे काही चुकत असेल तर मला माफी मागण्यास काही कमीपणा वाटणार नाही. परंतु हि लुटारु प्रवृत्ती सोकावली तर काळ आपल्याला माफ करणार नाही हे तितकेच खरे. देवळाली प्रवरा नगरपालिकेने या खाजगी डेडिकेटेड कोविड सेंटरला दुमजली इमारत, जागा, वीज, व पाणी विनामूल्य उपलब्ध करुन दिले आहे.
शिवाय या कोविड सेंटर साठी ५० बेड डॉ. तनपुरे कारखान्याच्या विवेकानंद नर्सिंग होम येथून उपलब्ध केले असताना यांनी साडेतीन ते दहा हजार रुपये कॉट भाडे आकारून कोविड रुग्णांची संगनमताने जी कोट्यवधींची लूट केली आहे.
तसेच औषधे व कोवीड सेंटरची बीले वेगवेगळी आकारली आहेत. मुळात ती एकत्रीत देणे गरजेचे असताना कागदोपत्री कमी बिले दाखवुन अडलेल्या जनतेकडून अव्वाच्या सव्वा बिलांच्या पठाणी वसुलीचे पितळ आम्ही उघड पाडणार आहोत.
गावातील काही रुग्णांनी याबाबत कैफियत मांडली आहे. एकंदरीतच या कोवीड सेंटरची सर्वंकष चौकशी करुन दुध का दुध और पाणी का पाणी करण्याचे आमचे प्रयत्नांस देवळालीची सुज्ञ जनता पाठिंबा देत आहे. त्यामुळे गरीब जनतेसाठी वेळ प्रसंगी तुरुंगात जायला सुद्धा आम्ही तयार आहोत याचा शेवटी बोलताना ढुस यांनी पुनरुच्चार केला.