अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी राहुरी तालुक्यातील पूर्वभागात मुळा नदीपात्रातील वाळुचा लिलाव करण्याचा निर्णय घेत राहुरीचे तहसीलदार फसिउद्दीन शेख यांना आदेश काढले.
त्यानुसार राहुरी तहसीलचे मंडलाधिकारी मेहेत्रे, कामगार तलाठी राहुल कर्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरी येथे विशेष ग्रामसभा घेत वाळू लिलावातून विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.
मात्र, ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविला. वेळ प्रसंगी रक्त सांडू पण वाळुचा खडा देखील उचलू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने अखेर वाळू लिलाव रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आढाव म्हणाले, आमच्या ठरावाला डावलून शासनाने वाळुचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी रक्त सांडू पण वाळुच्या खड्याला हात लावू देणार नाही.
मुळा नदीच्या पाण्यावर आमच्या अनेक पिढ्यांनी आपली उपजीविका करुन आपले प्रपंच स्थिरस्थावर केले. डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव म्हणाले, वाळुचा लिलाव झाला तर हजारो वर्षापासून नदीकाठावरील पिकणारी शेती उध्वस्त होऊन जनावरांसह लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल.
आमच्या अनेक पिढ्यांनी या वाळुचे संरक्षण केल्यामुळे आज मानोरी गाव शेतीसाठी सुजलाम सुफलाम आहे. त्या वाळुला आम्ही कदापी हात लावू देणार नाही. दरम्यान गावकऱ्यांच्या आक्रमकतेमुळे अखेर हा वाळू लिलाव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.