न्याय मिळण्यासाठी व खटले निकाली लागण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाची वेळ दुपारी चार पर्यंत करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- कोरोना काळात सोळा महिने बंद असलेले जिल्हा न्यायालय सुरु झाले असून, मात्र त्याची वेळ दुपारी दोन वाजे पर्यंत करण्यात आली आहे.

न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी व खटले निकाली लागण्यासाठी न्यायालयाच्या कामकाजाची वेळ चार वाजे पर्यंत करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. न्यायालये कायद्याचे व न्यायाचे पालक संरक्षक आहेत.

मात्र कोरोनाच्या संकटकाळात जिल्हा न्यायालय बंद असल्याने सर्वसामान्यांना न्यायापासून मुकावे लागले. तर कायद्याचे राज्य ही संकल्पना मोडित निघाली. अनेक ठिकाणी जागा बळकावणे, जागेच्या वादातून मारामारी, गुंडाच्या मदतीने घर खाली करणे आदी प्रकार सर्रास घडले.

सध्या न्यायालयाचे कामकाज सुरु झाले होते. मात्र तीसर्‍या लाटेच्या भितीने न्यायालयाचे कामकाजाची वेळ कमी करुन दुपारी दोन पर्यंत करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयाचे कामकाज जुजबी पध्दतीने सुरु आहे. जामीन अर्ज व तारखा देण्यापलीकडे कार्यवाही होत नसल्याने पिडीत न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

न्यायसंस्थेच्या कामात सरकार व जनता ढवळाढवळ करू शकत नसल्याने न्यायाधीशांनी देखील सर्वसामान्यांची जाणीव ठेऊन कर्तव्याप्रती जागृक राहिले पाहिजे. एकीकडे महसुल न्यायालय कोरोना काळात नियमांचे पालन करुन योग्य पध्दतीने सुरु होते. या धर्तीवर जिल्हा न्यायालयांचे कामकाज चालणे अपेक्षित आहे.

न्यायालयाचे कामकाज कासव गतीने चालवून सर्वसामान्यांना न्यायापासून वंचित रहावे लागत असून, कायद्याच्या राज्याला एकप्रकारे कोरोना झाला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय सुरु असताना ऑनलाईन पध्दतीने देखील चालवण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोना काही दिवसात संपणारी गोष्ट नसून, यासाठी योग्य नियोजन व उपाययोजना करण्याची गरज आहे. वंचित घटकांना न्याय मिळण्यासाठी प्रलंबीत खटले निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालयाचे कामकाज दुपारी चार वाजे पर्यंत चालवावे, ऑनलाईन प्रणालीचा स्विकार करुन ऑनलाईन खटले चालविण्यास पुढाकार घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24