अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-स्पेनमधील एका व्यक्तीवर कार्यालयातील सहकाऱ्यांसह २२ लोकांना कोरोनाबाधित केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूमध्यसागरातील मॅर्लोर्का बेटावरील एका कंपनीतील ४० वर्षीय व्यक्तीमध्ये काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे आढळून आली होती.
यानंतर सहकाऱ्यांनी त्याला घरी जाऊन क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला. मात्र, या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत तो कंपनीत येत राहिला.
उलट तो कार्यालयात आपल्या चेहऱ्यावरील मास्क खाली घ्यायचा व इतर सहकाऱ्यांच्या तोंडासमोर खोकत तुम्हाला कोरोना भेट देतो असे म्हणायचा.
शेवटी पीसीआर चाचणी केल्यानंतर या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या व्यक्तीमुळे कंपनीतील ५ जणांना कोरोनाची बाधा झाली.
या पाच जणांच्या कुटुंबातील तीन लहान मुलांसह इतर सदस्यांना तसेच जीममधील तिघांना कोरोनाची बाधा झाली. बाधितांपैकी आठ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
याप्रकरणी कोरोना महामारीत बेजबाबदारपणे वागणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.