अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या देखील फारच वाढत आहे.
शरीरातील विषाणू कमी होण्याच्या दृष्टीने रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडीसिवर( Remdisivir ) इंजेक्शनची टंचाई निर्माण होत आहे.
रुग्णांना वरील इंजेक्शन देण्याकरिता सबंधित डॉक्टर हे रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून मिळविण्यास सांगत आहेत यामध्ये रुग्णांच्या नातेवाईक यांची नाहक धावपळ उडत आहे.
याचाच गैरफायदा उचलून काही समाजकंटक इंजेक्शनचा गोरख धंदा मांडून बसले आहेत व यासंदर्भात काळाबाजार देखील समोर आला आहे. त्यामुळे शासनानेच हॉस्पिटलला इंजेक्शन चा पुरवठा करणे सुरु केले आहे.
हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मागणीनुसार इंजेक्शन्स पाठवले जात आहेत परंतु आपल्याच रुग्णाला शासनाने इंजेक्शन दिले याची माहिती पारदर्शक असणे गरजेचे आहे.
जेणेकरून शासनाकडून आपल्या रुग्णाच्या नावे इंजेक्शन मिळाले किंवा नाही याची खात्री रुग्णाला होईल.
कारण अनेक ठिकाणी रुग्णाच्या नावे इंजेक्शन आले असता रुग्णाला दिले जाते याची खात्री रुग्णाला नाही किंबहुना नातेवाईकाला देखील नाही,
आणि ह्याच इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे, असा संशय युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे या सर्वबाबी मध्ये पारदर्शकता येण्यासाठी ज्या रुग्णांच्या नावे शासनाने इंजेक्शन हॉस्पिटलला पाठवले आहे,
त्याची यादी हॉस्पिटलमध्ये लावणे सक्तीचे करावे, ही मागणी शहर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांना करण्यात आली आहे.