अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- नगर तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावपुढा-यांच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाला वैतागले असून, आरोग्य विभागाच्या वतीने प्रांताधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन गावपुढा-यांच्या पराक्रमाचा भांडाफोड केला आहे.
सर्वत्र कोरोनाचा उद्रेक झाला असुन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्व:ताच्या कुटुंबाचा विचार न करता कोरोना रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त आहे.
कोविड सेंटरला सेवा देणे, कोरोना तपासणी, लसीकरण तसेच शासकिय पातळीवर विवीध अहवाल तयार करणे. याचबरोबर कोरोना रुग्णांची तपशीलवार आकडेवारी तयार करणे या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत.
त्यातच अपुरे मनुष्यबळ असताना कर्मचारी जास्त वेळ काम करुन सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना गावपुढा-यांकडुन अरेरावी, दमबाजी करण्याचे प्रकार वाढत आहेत.
ज्याला अधिकार नाही अशा व्यक्ती आरोग्य केंद्रात येऊन डी फ्रिजर मध्ये हात घालून लस आहे किंवा नाही याची बळजबरीने पाहणी करत आहेत. तसेच कोणीही कामकाजाच्या अहवालाची मागणी करत आहेत. एखादा रुग्ण दगावल्यास त्याच्या अंत्यविधीची जबाबदारी आरोग्य विभागावर टाकण्यात येते.
गाव पुढा-यांकडुन वेळीअवेळी फोन करुन दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. हाच प्रकार महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत घडत असुन, यातुन मनोबल खच्ची होत आहे.
तरी आपण याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना दिलेल्या निवेदनात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.