अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- हळुहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. अशा थंडीमध्ये रस्त्यावर, रेल्वे स्थानक परिसरात उघङ्यावर झोपणाऱ्यांचे काय हाल होत असतील याचा विचार करुनच आपली हाडे गोठू लागतात.
अशा गरीब, भटक्या व्यक्तींवर मायेची चादर घालण्यास स्नेहबंध फाउंडेशन सरसावले. रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
जिथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार ब्लँकेट मिळणे अशक्यच. अशा जीवांसाठी आपण काही तरी करावे, या उद्देशाने स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे, सचिन पेंडूरकर, आकाश निऱ्हाळी, अनिकेत येमूल, संकेत शेलार यांनी रस्त्यांवर, फूटपाथवर झोपेत कुडकुडणाऱ्या गरिबांना ब्लँकेट दिले.
नगर शहरातील आनंदधाम परिसर, स्वस्तिक चौक, दिल्लीगेट, जिल्हा रुग्णालय, लाल टाकी, बालिकाश्रम रोड, कोठला स्टॅन्ड, तारकपूर परिसर आदी भागांत रस्त्यावर झोपलेल्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
यातील एक जण तर प्लास्टिक पिशवी अंगावर घेऊन झोपलेला होता. कसाबसा उदरनिर्वाह करून उघड्यावर आयुष्य काढणाऱ्या अंध, अपंग, गरीब, गरजूंचा यामध्ये समावेश होता.
कायमस्वरुपी निवारा नसल्याने ते फूटपाथ वा रस्त्याच्या कडेला आश्रय घेऊन झोपतात. थंडीच्या दिवसात जे काही मिळेल ते अंगावर घेऊन कुडकुडत कशीबशी रात्र काढतात.
पहाटे शेकोटी करून थंडीवर मात करण्याचा तोकडा प्रयत्न करतात. या दररोज घडणाऱ्या बाबी स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी टिपलेल्या होत्या.
त्यावर उपाय म्हणून स्वत:पासून ब्लँकेट वाटपाचा निर्णय त्यांनी घेतला. मायेची ही ऊब पाहून गरजवंतांच्या चेहऱ्यावरही स्मित उमटले.