अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- आषाढी एकादशीनंतर वेध लागतात ते श्रावण महिन्याचे. श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा सात्विक महिना . या महिन्यात श्रावणी सोमवारला अनेकजण व्रत करतात. उद्यापासून (सोमवार ९ ऑगस्ट २०२१रोजी ) श्रावण आहे.
पहिल्या श्रावण सोमवारपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होते. या दिवशी शिवपूजन केले जाते. पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आहे. तसेच शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तीभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूजा पूर्ण झाल्याचे म्हटले जाते.
तर मग जाणून घेऊयात या श्रावणी व्रतांबाबत अधिक माहिती श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास केला जातो.तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा. श्रावणात सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर शिवशंकराचे ध्यान करावे.
प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. पाचवा श्रावणी सोमवार आल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.
श्रावणी सोमवार व्रत :- शिवपूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, ‘ॐ नमः शिवायै’ या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो उष्टे खाऊ नये.
सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी, असे सांगितले जाते.प्रत्येक मुलीला वाटते की, आपण जेव्हा सासरी जातो, तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्त्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे.
तो वसा केल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा… माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत शिवाची धारणा करावी.