महिलांवरील अत्याचार , छळ आदी गोष्टी कमी होताना दिसत नाहीत. याबाबत अनेकवेळा प्रबोधन झाली किंवा कायदेही झाले परंतु या घटना थांबताना दिसत नाहीत. परंतु धक्का तर तेव्हा बसतो जेव्हा सज्ञान व्यक्तींकडून अशा गोष्टी घडत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव यांच्यासह तिघांविरोधात पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. स्वतः त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली असून त्यानुसार पती अभिजीत प्रभाकर जाधव, सासू सुलोचना प्रभाकर जाधव व जाव सुरेखा सचिन जाधव (सर्व मुळ रा. नाशिक, हल्ली रा. पाइपलाइन रस्ता, सावेडी, नगर) यांवर गुन्हा दाखल झालाय.
फिर्यादीत दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीचा विवाह अभिजीत जाधव यांच्यासोबत डिसेंबर २००७ मध्ये झाला होता. सासरचे लोक किरकोळ कारणावरून वाद घालत होते. दरम्यान अभिजीत जाधव पोलिस उपनिरीक्षक झाले व पुणे येथे राहण्यासाठी गेले. तेथे देखील फिर्यादीचा छळ सुरूच होता. अभिजीतची नाशिक येथे बदली करण्यासाठी फिर्यादीला माहेरून दोन लाख आणण्याची मागणी केली.
पैसे त्याची दिले, ते नाशिकलाही गेले. परंतु तेथेही त्यांचा छळ सुरूच होता. जेव्हा ते नगरला आले तेव्हा तेथेही त्यांना वाईट वागणूक मिळू लागली. अखेर फिर्यादी यांनी याबाबत अभिजित यांना विचरले असता त्यांना मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २० नोव्हेंबर रोजी रात्री त्यांना पुन्हा मारहाण करत घराबाहेर काढून दिले असे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आता अधिक तपास पोलीस करत आहेत.