अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलीस असल्याची बतावणी करून तसेच अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याचे प्रकारात वाढ होत आहे.
नुकतेच असाच काहीसा प्रकार शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडला आहे. एका तोतया तलाठ्याने पिकविम्याचे पैसे काढून देण्याचा बहाणा करत वृद्ध महिलेकडील रोकड व सोन्याचे दागिने लुटले.
हि घटना माळीवाडा बस स्थानक परिसरात ही घडली. लुट झालेल्या वृद्ध महिला शांताबाई सोपान मोरे (वय 65 रा. वाळुंज ता. नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तोतया तलाठी इसमावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
नायनाट वर्दळीचा आणि गजबजलेला या परिसरात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शांताबाई मोरे या त्यांच्या बहिणीला रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी माळीवाडा बस स्थानकावर बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी तेथे एक अनोळखी इसम आला.
तो शांताबाई यांना म्हणाला, मी तुम्हाला ओळखतो, मी वाळुंज गावचा तलाठी आहे. तुमचे बँकेमध्ये पिकविम्याचे सात हजार रूपये आले आहे. ते काढून देतो, असे म्हणत त्याने शांताबाई यांचा विश्वास संपादन केला.
त्यांना रिक्षामध्ये बसविले. रिक्षा पुणे बस स्थानकाच्या मागे घेऊन जात शांताबाई यांच्याकडील दोन हजार रूपयांची रक्कम व सोन्याचे दागिणे असा 37 हजारांचा ऐवज लुटला. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहे.