अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे काही कालावधीसाठी बंद करण्यात आले आहे.
मात्र सुट्टीचा वार असल्याने नागरिक देखील घरात बसायला तयार नाही आहे. यामुळे पर्यटन बंद असताना देखील नागरिक पर्यटन स्थळावर गर्दी करताना दिसून येत आहे.
यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजले जाणाऱ्या भंडारदरा पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता भंडारदरा वन्यजीव विभाग,
परिसरातील वनसमित्या, सरपंच, पोलीस पाटील यांनी संयुक्त बैठक घेत शनिवार व रविवारी पर्यटनस्थळी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
सोमवार ते शुक्रवारपर्यंत पर्यटकांना पर्यटनस्थळ खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार, रविवारी भंडारदरा हे पर्यटनस्थळ बंद असल्याचे माहीत नसलेल्या अनेक पर्यटकांना नाराज होत माघारी जावे लागत आहे.
पर्यटकांना आकर्षित करणारे भंडारदरा हे पर्यटनस्थळ नेहमीच गजबजलेले असते. वीकेंडला जास्तच गर्दी असते.
या शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. परंतु प्रवेश नसल्याने नाराज होत पर्यटकांना माघारी जावे लागले आहे