अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- राज्यात ‘मिशन ब्रेक द चैन’ अंतर्गत जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात पुढील 25 दिवस मिनी लॉकडाऊन असणार आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्याबाबत आदेश काढण्यात आले असले तरी याला काही व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे.निर्बंध शिथील करावेत अशी मागणी संघटनांनी केली आहे.
वाढत्या करोनामुळे जिल्हा प्रशासनाने आदेश काढून काही निर्बंध लागू केले आहेत. यातून आरोग्य सेवा, किराणा दुकाने, फळे- भाजीपाला, शेतीचे कामे, सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, पेट्रोलपंप खुले असणार आहे. बाकी आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत.
आस्थापना सुरू असल्यास त्यावर पोलीस व पालिका पथक कारवाई करणार आहे. तसे आदेश संबंधितांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. करोना रुग्ण उपचारासाठी आल्यावर त्याच्याकडे डिपॉझिटची मागणी केल्यास किंवा अवास्तव बिल आकारणी केल्यास अशा रूग्णालयावर कारवाई केली जाणार आहे.
राज्यासह जिल्ह्यात वाढत असलेल्या करोना संसर्गामुळे निर्बंध घातलेले आहेत. निर्बंधांचा विचार शासन स्तरावर होईल. परंतु जे निर्बंध लागू केले आहेत, याचे पालन करणे सध्यातरी करोनाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे.