अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर शहरांतर्गत सध्या नागरिकांना नागरी समस्या बरोबरच आता मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. शहरांतर्गत बहुतांश रस्ते नादुरुस्त आहेत.
भूमिगत ड्रेनेज योजना, अमृत पाणी योजना व केबल नेटवर्कसाठी खोदून ठेवलेले रस्ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत. परिणामी, या रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था व महामार्गालगतची नागरी सुविधांची कामे करताना त्यात होणारी संथगती यामुळे नगरमधून जाणाऱ्या महामार्गांवर तसेच शहरांतर्गत दिल्लीगेट, नवीपेठ,
चितळे रस्ता व अन्य भागातही वाहतूक जाम होऊन वाहनांची कोंडी होण्याचे प्रकार मागील आठवड्यापासून वाढले आहे. वाहतूक पोलिसांकडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य दिले जाते,
पण शहरांतर्गत वाहतूक कोंडी मात्र सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतूक पोलिसही हतबल झाले आहेत. दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ खुद्द पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यावरच आल्याने त्यांनी वाहतूक कोंडीची ही समस्या दूर करण्याचे काम गांभीर्याने मनावर घेतले आहे.
मनपाच्या संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणून त्यांच्याकडून वाहतूक कोंडीवरील मनपास्तरावरील आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन त्यांनी सुरू केले आहे.
दरम्यान शहरातील जीपीओ चौकापासून चांदणी चौकापर्यंत उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने त्या भागात दोन्ही बाजूंचे रस्ते लहान झाले आहेत. यामुळे महामार्गांवर वाहनांची रांगच रांग दिवसभर असते.
अशा स्थितीत स्थानिक शहरांतर्गत छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतूक महामार्गांवर आल्यास वाहतूक कोंडीत भरच पडते. नेप्ती चौकाकडून नीलक्रांती चौकाकडे येण्यासाठी साताळकर हॉस्पिटल मार्गे एकेरी वाहतुकीचा रस्ता मनपाने दुरुस्ती कामामुळे बंद केला आहे.
त्यामुळे आता नेप्ती चौकाकडून येणारी वाहतूक दिल्लीगेट मार्गे नीलक्रांती चौकाकडे जाते. याच रस्त्यावर दिल्लीगेट ते नीलक्रांती चौकादरम्यान रस्त्यातील खड्डे दुरुस्तीसाठी मनपाने खडी टाकल्याने त्यावरून वाहने नेणेही वाहनचालकांना कसरतीचे होत आहे
व ही खडी चुकवण्यासाठी बहुतांश वाहने रस्त्याच्या मधोमध जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली आहे. वाहतूक पोलिसांच्यादृष्टीने महामार्गावरील व शहरांतर्गत वाहतूक कोंडीची समस्या वैतागाची झाली आहे.