“फिरस्त्या” जागतिक पातळीवर ! पुरस्कारांचे अर्धशतक!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- अहमदनगर येथील युवा अभिनेता हरिष देविदास बारस्कर याची प्रमुख भूमिका असलेल्या “फिरस्त्या” या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा मधे पुरस्कारांचे अर्धशतक नुकतेच पूर्ण झाले.

फिरस्त्या या चित्रपटाच्या निमित्ताने हरिष ने केलेली ही दिलखुलास मुलाखत. अहमदनगर शहराचे उपनगर असलेल्या सावेडी भागातील भिस्तबाग येथील हरिषच्या निवासस्थानीच त्याची भेट झाली.

हरिष हा सावेडी मधील रेणाविकर विद्या मंदिरचा इयत्ता दहावी पर्यंतचा विद्यार्थी.पदवीचे शिक्षण घेत असताना छंद म्हणून अभिनयाची गोडी लागली, रंगभूमीवर नाटक करण्याचा छंद महाविद्यालयीन जीवनापासून सोबत करत असला तरी अभ्यासाचे ओझे पेलताना हाच छंद पुढे करिअर म्हणून पुढ्यात येईल असे त्याला वाटलेही नाही !

नगरच्या IBMRD कॉलेज मधून एम.बी.ए चे शिक्षण घेत असताना अभिनयाची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना, स्वतःला व्यावसायिक नट म्हणून सिद्ध करण्यासाठी या बह्हादराने एम.बी.ए केल्यानंतर मिळालेल्या नोकरीला राम राम ठोकत अभिनयाला सलाम केला आहे.

“जाणता राजा महानाट्य” पासून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवां पर्यंत पोहोचला आणि हरिष ने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. चंदेरी दुनियेचा एक अलिखित नियम आहे. इथे जो कठोर मेहनत घेतो तोच यशस्वी होतो. मग त्याने अभिनयाचं किंवा दिग्दर्शनाच प्रशिक्षण घेणं, न घेणं हि इथं दुय्यम गोष्ट ठरते.

रसिकही अशा कलाकारांना डोक्यावर घेत असल्याची बरीच उदाहरणं आपण पहिली आहेत. अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण कोणतीही पार्श्वभूमी नसताना ,घराण्यात कलेचा वारसा नसतांना हरिष ने अभिनयाचे ज्ञान पुस्तकांआधारे घेताना एकापाठोपाठ एक अभिनयाची पुस्तकं वाचली.पुण्या मुंबई ला जाऊन व्यावसायिक नाटकं पाहिली.

या हौसेतूनच अभिनयाचे धडे घेत असतानाच २०१५ साली “निर्मिती रंगमंच” ही नाट्यसंस्था सुरू करून या संस्थे मार्फत नाटयनिर्मिती चे काम केले. हौशी एकांकिका स्पर्धेत सहभाग नोंदवला व भरघोस बक्षीसही मिळवली.

त्यानंतर २०१७ मध्ये ५६ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धत ‘खटारा’ या नाटका साठी हरिष ला अभिनयाचे रौप्य पदक मिळाले, स्पर्धेत गाजलेले हे नाटक पुढे व्यावसायिक रंगभूमीवर देखील सादर केले, त्यात प्रमुख अभिनेता व निर्मिती प्रमुख या भूमिका हरिष ने यशस्वीपणे पार पाडल्या. या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर खूप सारी प्रसिद्धी व प्रशंसा मिळवली. त्यामुळे उत्साह दुणावला, असे सांगताना हरिष भूतकाळातील आठवणीत रमतो.

नाट्य व चित्रपट क्षेत्रात अभिनेता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत मागील दोन वर्षांपासून मुंबईत तग धरून असलेल्या हरिषने मुंबईमध्ये आल्यावर ‘एक होती राजकन्या ‘, ‘विठू माउली ‘, स्वराज्य जननी जिजामाता ‘ या मालिकांमध्ये अभिनय केला आहे , २०१६  मध्ये नगर मध्ये असतानाच घुमा चित्रपटात काम केल्याचा फायदा मालिकेत काम मिळवण्यासाठी झाला.

मुंबईत आल्यावर अरुणा , ट्रिपल सीट, चेपस , गिर्दाब , सावित्र्यायन हे चित्रपट केले , जॉबलेस हि वेब सिरीज केली आहे , ३५ हून अधिक शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत . “फिरस्त्या” या चित्रपटाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक कलाकार म्हणून आत्मविश्वासाने पावले टाकण्याचा शुभारंभ हरिष ने केला आहे.

चित्रपटा विषयी सांगताना हरिष म्हणाला श्री. विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनी स्वतः लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या ‘फिरस्त्या‘ या चित्रपटाची निर्मिती डॉ.स्वप्ना विठ्ठल भोसले यांच्या “झुंजार मोशन पिक्चर्स” या निर्मिती संस्थे द्वारे झाली.

फिरस्त्या च्या सर्व टीम ने या चित्रपटासाठी दोन वर्षांपासून अथक मेहनत घेतली. या चित्रपटाचे शूटींग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अकोले खुर्द या गावात आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात करण्यात आले. त्याबरोबरच पुणे, सातारा, दिल्ली, मुंबई या शहरांमध्ये देखील या चित्रपटाचे शुटिंग झाले आहे.

या चित्रपटात ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत “अभ्या” (अभिमन्यू जहागीरदार) ची भूमिका केलेले समीर परांजपे, ‘तेरी लाडली मैं’ या मालिकेत प्रमुख भूमिका केलेली मयूरी कापडणे, ‘देवमाणूस’ या मालिके मधील अंजली जोगळेकर, बाल कलाकार – श्रावणी अभंग, समर्थ जाधव, आज्ञेश मुडशिंगकर यांनी ‘ फिरस्त्या’ या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. छायाचित्रण – गिरीष जांभळीकर, संकलन- प्रमोद कहार,

पार्श्व गायक – आदर्श शिंदे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, संगीत – रोहित नागभिडे, देवदत्त मनिषा बाजी, गीत- गुरु ठाकूर, वैभव देशमुख, पार्श्व संगीत – रोहित नागभिडे, डी आय कलरिस्ट विनोद राजे यांनी केले आहे. आपल्या धेया मागे धावणाऱ्या एका मुलाच्या बालपण, किशोरवय आणि तरुणपणी चा प्रवास, त्याच्या जीवनात काय-काय घटना घडतात ?

यावर हा चित्रपट बेतला आहे. फिरस्त्या ही ग्रामीण भागातील एका मुलाच्या संघर्षाची कहाणी आहे. ही गोष्ट केवळ त्या मुलाच्या जीवनातील नसून फिरस्त्या सारखे जीवन जगणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी आहे. या चित्रपटात खरा संघर्ष पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनापूर्वीच “फिरस्त्या” ने भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर,

चेक रिपब्लिक आणि रोमानिया या 11 देशांमधील 24 इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल्स मध्ये एकूण 53 पुरस्कार मिळवत पुरस्कारांचे ‘अर्धशतक’ पूर्ण केले आहे. या अगोदर “फिरस्त्या” हा चित्रपट पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) 2021 मध्ये सिलेक्ट झाला आहे ज्याचा अंतिम निर्णय येणे अजून बाकी आहे. शिवाय “फिरस्त्या” चे भारत, अमेरिका, युनाइटेड किंग्डम, अर्जेन्टिना, स्पेन, स्वीडन, व्हेनेझुएला, लिथुआनिया,

त्रिनिदाद आणि टोबॅगो या 9 देशांतील एकूण 11 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये Official Selection झाल्याचे नुकतेच हाती आलेले वृत्त लाॅकडाऊनमध्येही आनंद देणारे ठरले.भरपूर नामांकन आणि मानाचे पुरस्कार मिळवत जागतिक पातळीवर हरिषचे व नगरचे नाव झळकू लागले आहे. ‘फिरस्त्या’च्या यशामुळे हिम्मत वाढली असे हरिष सांगतो तेव्हा त्याच्या डोळ्यातील विश्वास लक्ष वेधून घेतो.

मोठे कलाकार ‘वर्ल्ड सिनेमा’ मध्ये आपला वेगळा ढसा उमटवतात. त्या कलाकारांची कला आत्मसात करून वर्ल्ड सिनेमांच्या धर्तीवर ताकतीने काम करण्याचा ध्यास हरिषने घेतला आहे.

त्याचा ध्यास पूर्ण होणे देशाची मान उंचावणारे ठरणार आहे. त्यासाठी हरिषला शुभेच्छा देऊन निघताना कलेसाठी जीवन समर्पित करणारा युवा कलावंत भेटल्याचे समाधान मिळाले.

अहमदनगर लाईव्ह 24