अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे.
वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले. जिल्हा पोलीस दल आणि स्नेहबंध सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती प्रांजली सोनवणे, पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक अनिल कटके, राखीव पोलीस निरीक्षक दशरथ हटकर, वरिष्ठ मंडल प्रबंधक अभय चंद्रस,
जिल्हा विशेष शाखा राजेंद्र पाटील, मोटार परिवहन विभाग भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब बेरड, अमोल कानडे व सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते. स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, वृक्ष आणि वन याचं महत्त्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’
या अभंगाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ग्लोबल वार्मिंगच्या समस्यांवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव पर्याय आहे. भावी पिढ्या व सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी व पावसासाठी वृक्षारोपण व संवर्धन अत्यावश्यक आहे.
स्नेहबंध फाउंडेशनच्या पुढाकारातून नगर शहरामध्ये अनेकदा वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता त्यानुसार नागरिकांच्या सहकार्याने लागवड व संवर्धन सुरू केले आहे.त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.