वृक्षरोपण ही निसर्गरुपी देवाची उपासना -उपमहापौर गणेश भोसले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-   येथील मिरावली पहाडवर गुलशन प्रतिष्ठान व साहेबान जहागीरदार मित्रपरिवाराच्या वतीने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. 101 झाडे लावण्याच्या अभियानाची सुरुवात महापालिकेचे उपमहापौर गणेश भोसले व युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते वृक्षरोपणाने झाली.

मिरावली पहाड येथे येणार्‍या भाविकांसाठी उद्यान उभारुन हिरवाई फुलविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. गणेश भोसले यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार कार्यक्रमास फाटा देऊन वृक्षरोपणाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी गुलशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै. जिशान शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, बाबासाहेब जहागिरदार, डॉ. रिजवान शेख, डॉ. इमरान शेख, डॉ. शबनम शेख, डॉ.प्राजक्ता पारधे, अमित गाडे, राहुल सांगळे, इरफान जहागीरदार,

जावेद शेख, राजू जहागीरदार, तमीम शेख, चाँद शेख, भैय्या साळुंके, किरण शिंदे, सुफियान शेख, हातिम शेख, अब्दुल खोकर (जीएम), तमीम शेख, निहाल शेख, सलमान शेख, शाहनवाझ काझी, अली साय्यद, दिलावर शेख, आकाश हुशारे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रफिक मुन्शी यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मिरावली पहाडवर मुलभूत सुविधा निर्माण करुन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याचे स्पष्ट करुन, शहरातील सर्व कब्रस्तानमध्ये महापालिकेच्या सहकार्याने वृक्षरोपण करणार असल्याचे सांगितले. साहेबान जहागीरदार म्हणाले की, मिरावली पहाड येथे देशातून विविध ठिकाणचे भाविक येतात.

हा परिसर हिरवाईने फुलविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून वृक्षरोपण करुन अनेक झाडे जगविण्यात आली. पर्यावरणाप्रती आस्था प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. कोरोनाने पर्यावरणासह ऑक्सिजनचे महत्त्व जगा समोर आनले.

मनुष्याने काळाची गरज ओळखून या वृक्षरोपण मोहिमेत सहभागी होण्याची गरज आहे. वृक्ष जगले, तर सजीव सृष्टी टिकणार असल्याचे त्यांनी सांगितले. पै. जिशान शेख यांनी मिरावली पहाड येथे उद्यान उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

ही मोहिम एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता वर्षभर वृक्षरोपण व संवर्धन करुन पहाडवर उद्यान फुलविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. अक्षय कर्डिले यांनी सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेले मीरावली पहाडवर सर्व सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने मा.आ. शिवाजीराव कर्डिले यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला.

पहाडवर वृक्षरोपण करुन सुशोभीकरणासाठी घेण्यात आलेला पुढाकार कौतुकास्पद असून, मनुष्याला जगण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही. झाडांकडून ऑक्सिजन मिळवण्यासाठी वृक्षांना जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, वृक्षरोपण ही निसर्गरुपी देवाची उपासना आहे.

मनुष्याने या उपासनेकडे दुर्लक्ष करुन निसर्गाची हानी केल्याने नैसर्गिक संकटे ओढवली गेली आहे. झाडे लावणे व जगवणे हे पवित्र कार्य आहे. शहरात स्वत:चा प्रभाग आदर्श करताना वृक्षरोपणाला महत्त्व देऊन झाडे जगविण्यात आली.

आज संपुर्ण प्रभाग हिरवाईने नटला आहे. जगण्यासाठी अन्न, पाणीपेक्षा अधिक महत्त्वाचा ऑक्सिजन आहे. मात्र ऑक्सिजन देणारे झाडे लावण्यासाठी सर्वसामान्य नागरिक पुढाकार घेत नाही. जगण्यासाठी झाडे लावून आपणच आपली सोय करण्याची गरज आहे.

एक झाड फुलविण्यासाठी मोठा काळावधी लागत असल्याने सर्वांनी नियोजन करुन वृक्षरोपण चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. या वृक्षरोपण अभियानसाठी मिरावली पहाडचे मुजावर,

देवाज ग्रुप, अमित गाडे पैलवान प्रतिष्ठान, अजित कोतकर मित्रपरिवार, मृत्युंजय प्रतिष्ठान, जगदंबा प्रतिष्ठान, जय बजरंग ग्रुप, कर्मयोगी प्रतिष्ठान, चाँद भाई मित्रपरिवार, मतीन भाई मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले.

अहमदनगर लाईव्ह 24