धनदांडग्यांच्या तावडीतून जमिनी सोडवण्यासाठी पारनेर तालुक्यापासून आदिवासींचे आंदोलन होणार सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- आदिवासींच्या जमीनी परत मिळण्यासाठी पारनेर तालुक्यापासून आदिवासी काळीआई मुक्तीसंग्राम सुरु करण्याची घोषणा पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने करण्यात आली आहे.

बिगर आदिवासी असलेल्या धनदांडग्यांनी गिळंकृत केलेल्या आदिवासींच्या जमीनी परत मिळण्यासाठी जिल्हाभर हा सत्याग्रह चालविण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनाचे निमंत्रक शंकरराव साळवे व अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने 1974 साले राज्यातील आदिवासींच्या जमीनी परत मिळवून देण्यासाठी क्रांतिकारक कायदा केला.

त्याच वेळेला आदिवासींचे जमिनीची खरेदी-विक्री आणि हस्तांतर करण्याला बंदी केली. सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय आदिवासींच्या जमीन बिगर आदिवासींना खरेदी करता येत नाही किंवा आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण किंवा ताबा सुद्धा मिळवता येत नाही.

असे असताना जिल्ह्यातील शेकडो एकर आदिवासींच्या जमिनी धनदांडग्यांनी घशात घातल्या आहेत. पारनेर तालुक्यात देखील आदिवासींच्या जमिनी बळकावण्यात आल्या असून, या तालुक्यातून संघटनेने आदिवासी काळीआई मुक्तीसंग्राम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनात सक्रीय असलेले राजू चिकणे यांनी सर्व आदिवासींना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात शांताराम चिकणे, विठ्ठल चिकणे, हरणाबाई केदार, लहानुबाई पारधी, सिताराम जाधव, लिंबाजी चिकणे, जिजाबा चिकणे यांनी पुढाकार घेतला आहे.

12 ऑक्टोबर 1949 च्या महसुल खात्याच्या आदेशाप्रमाणे रामा महादू चिकणे यांना 40 एकर 26 गुंठे तर महादू लक्ष्मण चिकणे यांना 40 एकर 19 गुंठे अशी माळाची जमीन मिळाली होती. या दिवसापासून या लोकांना जमिनीची मालकी आदिवासी म्हणून मिळालेली आहे.

त्यांच्या वारसांना फसवून बिगर आदिवासींनी यापैकी काही जमीन लाटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याचबरोबर इतर आदिवासींच्या जमिनी सुद्धा बिगर आदिवासींना गिळंकृत केल्या आहेत.

या जमिनी वाचविण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातही आदिवासींच्या जमीनी त्यांना परत मिळण्यासाठी व्यापक स्वरुपात हा लढा सुरु ठेवण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24