अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- आदिवासी शेतकरी वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी हिसकावून घेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हरिश्चंद्र-अभयारण्य परिसरात वन विभागाने आदिवासी शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांमध्ये रानटी झाडे लावण्याचे प्रकार सुरू केले आहेत.

आदिवासींची उभी पिके उध्वस्त करण्याचे प्रयत्न केलेे. वन विभागाच्या या अन्यायाविरोधात किसान सभेने वन विभागाने शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांमध्ये लावलेली ही रानटी झाडे उपटून काढत प्रशासनाचा निषेध केला आहे.

अकोले तालुक्यातील लव्हाळी ओतूर येथे मारुती मंदिरात सभा घेऊन व वाजतगाजत माकप किसान सभेने मोर्चा काढत शेतातील वनविभागाची झाडे उपटून फेकत आंदोलनाची सुरुवात केली. आदिवासी शेतकरी कसत असलेली जमीन कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठीची प्रक्रिया देशभर सुरू आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी यासाठी विहित प्रक्रियेअंतर्गत वनाधिकार ग्राम समित्यांकडे अर्ज केले आहेत. किसान सभेच्या पुढाकाराने परिसरातील हजारो गरीब शेतकर्‍यांची वन प्रकरणे पात्र करण्यासाठी अपिले दाखल करण्यात आली आहेत.

असे असताना कोणत्याही आदेशाची किंवा अंतिम निकालाची वाट न पाहता वन विभाग आदिवासींच्या शेतात अशाप्रकारे घुसणार असेल तर आदिवासींना किसान सभेच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात घुसावे लागेल असा इशारा यावेळी किसान सभेचे नामदेव भांगरे यांनी दिला आहे.

भर पावसात वाजत-गाजत काढण्यात आलेल्या या मोर्चात अभयारण्य परिसरातील 23 गावचे शेतकरी सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्य व क्रांतिकारक घोषणा देत मारुती मंदिरातून मोर्चाला सुरुवात झाली.

गावाच्या मुख्य रस्त्यावरून मोर्चा अभयारण्यात नेण्यात आला.यावेळी शेतकर्‍यांच्या शेतात लावलेली झाडे उपटत यावेळी वन विभागाच्या अन्यायाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. उपटलेली झाडे वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जंगलामध्ये नेऊन लावली गेली.