कोरोनाच्या काळात क्षयरोग हवेतून पसरण्याचे प्रमाण झाले कमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. सुरक्षित काळजी घेतल्याने व नियमांचे पालन केल्याने कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या काळात क्षयरोग हवेतून पसरण्याचे प्रमाण कमी झाले. कारण अनेकांनी मास्क, तसेच सुरक्षित अंतर राखल्याने हवेतून संसर्ग कमी झाला. परिणामी इतर वर्षांपेक्षा कोरोनाकाळात क्षयरोगी कमी आढळले. क्षयरोग रूग्णांचे निदान करून याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत.

जे क्षय रूग्ण उपचार घेत आहेत, त्यांना नि:क्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रूपये देण्यात येतात. या रूग्णांना औषधे शासनाकडून मोफत मिळतात. रूग्णांना औषधोपचारासह सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात सध्या २,१४७ क्षयरोग्यांवर उपचार सुरू आहेत.

त्यापैकी १,६६८ जणांना प्रति महिना ५०० रूपये पोषण भत्ता दिला जातो. इतरांचे बँक खाते उपलब्ध नसल्याने त्यांना भत्ता मिळत नसल्याचे क्षयरोग कार्यालयाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात पूर्वी क्षयरोगाचे प्रमाण अधिक होते. दरम्यान राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ते अजूनही जास्तच आहे.

परंतु कोरोना काळात आवश्यक ती खबरदारी प्रत्येकांकडूनच घेतली गेल्याने या काळात रोगाचा प्रसार पूर्वीपेक्षा कमी झाला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी औषधोपचारांची काळजी घेतल्याने क्षयरोग बरा होण्याचे प्रमाणही वाढले.

अहमदनगर लाईव्ह 24