अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळतो आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्ती देखील चांगलीच त्रासली आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाया करण्यात येत नसल्याने हे उद्योग वाढले आहे. याचाच उद्रेक राहुरी तालुक्यात पाहायला मिळाला आहे.
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे सुरू असलेले अवैध धंदे त्वरीत बंद करावेत. यासाठी फॅक्टरी परिसरातील महिलांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच येत्या 48 तासात अवैध बंद झाले नाहीतर नगर-मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसाद नगर भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे या परिसरातील अनेक प्रपंच उद्धस्त झाले आहेत. दारूच्या आहारी जाऊन अनेकजण मयत झाले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर दारू व्यवसायासह बेकायदेशीर सावकारी व्यवसाय सुरू आहे.
अवैध व्यवसायीक हे गुंड प्रवृत्तीचे असल्याने परिसरात नेहमीच दहशतीचे वातावरण असते. याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती दिली तरी देखील स्थानिक पोलीस प्रशासन व अवैध व्यवसायिकांचे आर्थिक हितसंबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही.
येत्या 48 तासात हे सर्व अवैध धंदे बंद करा अन्यथा राहुरी फॅक्टरी येथील आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार, असे राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.