अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-जामखेड शहरातील दोन तरुणांकडे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणलेल्या ९५ हजार रुपये किमतीचे चार पिस्टल व सहा जीवंत काडतुसे आढळुन आली आहेत.
त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मागे पिस्टल विक्री करण्याचे मोठे रॉकेट आहे का याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. या बाबतची माहिती कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव (वय २२ वर्षे रा.जामखेड) व दीपक अशोक चव्हाण (वय ३२ वर्षे रा. तपनेश्वर गल्ली जामखेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले की, जामखेड शहरात अवैद्यरित्या बंदुकीची खरेदी विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात यांच्या सह पो.हे.कॉ संजय लाटे, आबासाहेब आवारे, संग्राम जाधव, अविनाश ढेरे, विजयकुमार कोळी, अरुण पवार, संदिप राऊत, संदिप आजबे, विष्णू चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन खातरजमा केली.
या नंतर आरोपी ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव यांच्या तपनेश्वर गल्ली येथील राहात्या घरामध्ये छापा टाकला असता, या वेळी घेण्यात आलेल्या झाडाझडतीत त्या घरात विनापरवाना ७.६२ एमएमची २५ हजार २०० रुपये किमतीचे १ अग्निशस्त्र पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळुन आली.
त्याने ही शस्त्रे दिपक चव्हाण रा.तपनेश्वर गल्ली याच्या कडुन खरेदी केली आसल्याचे सांगितले. त्या नुसार दुसरा आरोपी दीपक अशोक चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे ७० हजार ४००रुपये किमतीचे एकूण ३ पिस्टल व ४ जीवंत काडतुसे मिळुन आली.
दि.१२ रोजी पोलिसांनी ही पिस्टल आरोपींच्या घरी छापा टाकून जप्त केली आहेत. शहरात अनेक वेळा बेकायदेशीर रिल्हॉलवर वापरून गुन्हा केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच पुन्हा चार पिस्टल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आता याचे मोठे रॉकेट तर नाही ना याचा तपास पोलीस करीत आहेत.
या प्रकरणी पो.कॉ.आबासाहेब आत्माराम आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषी उर्फ पप्पु मोहन जाधव व दिपक अशोक चव्हाण (दोघे रा.तपनेश्वर गल्ली) यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात हे करत आहेत.