अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- जामखेड तालुक्यातील खर्डा भागातून बनावट दूध तयार करण्याचे आणखीन एक रॅकेट जामखेड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. खर्डा व नागोबाचीवाडी येथील बनावट दूध बनवण्याचे अड्डे उद्ध्वस्त करत २ हजार ११८ लिटर बनावट दूध नष्ट करण्यात आले.
तब्बल २ लाख रूपये किमतीचे बनावट दूध बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील एका दूध संकलन केंद्रावर बनावट दूध तयार केले जात असल्याची गुप्त बातमी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासह संयुक्त छापे टाकले. खर्डा भागातील नागोबाचीवाडी येथून ८७८ लिटर तर खर्डा येथून १२४० लिटर असा एकुण २ हजार ११८ लिटर बनावट दुधाचा साठा हस्तगत केला. तर १ लाख ९० हजार रूपये किमतीचे बनावट दूध तयार करण्याची पावडर, केमिकल, व अन्य साहित्याचा साठा घरातून व दूध संकलन केंद्रातून जप्त करण्यात आला आहे.
या कार्यवाहीने जामखेड तालुक्यात दूध भेसळीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत काय कारवाई होती याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेले बनावट दूध जागेवर नष्ट केले आहे.
तर बनावट दूध तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य अन्न औषध प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. बनावट दूध तयार करण्याचे जप्त केलेल्या साहित्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले.