अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :- गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार तर एक जखमी झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात घडली.
याबाबत सविस्तर असे की, संगमनेर तालुक्यातील समनापूर व कोल्हेवाडी परिसरात काही बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे.
कोल्हेवाडी परिसरातील करपड वस्ती येथील अरुण पांडुरंग वामन यांनी यांच्या गोठ्यामध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या. पहाटे चार वाजेच्या सुमारास तीन बिबटे याठिकाणी आले.
त्यांनी या गोठ्यात घुसून शेळयांवर हल्ला केला. शेळ्यांच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ घराबाहेर आले. बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या तर एक जखमी झाली.
वनखात्याला याबाबत माहिती मिळताच वनकर्मचारी संपत ढेरंगे घटनास्थळी आले. वनखात्याने कोळेवाडी येथे पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एकाच वेळी तब्बल तीन बिबटे असल्याने नागरिकात चांगलीच भीती पसरली आहे.