दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-कोपरगाव शहरातील दोन अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. यातील एक मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकते आहे.

तर दुसरी घरकाम करणारी आहे. प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, की एका मुलीचे वय १२ असून ती इयत्ता सातवीत शिकते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळून सोमवारी (१५) रोजी रात्री १९.४५ वाजेच्या सुमारास ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी आलीच नाही.

म्हणून तिच्या पालकांनी तिची सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. मुलीच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती.

याबाबत तपासी अधिकारी हेड कॉन्स्टेबल डी. आर. तिकोणे यांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन अवघ्या दोनच दिवसात येवला तालुक्यातील तळवडे येथे आरोपीला अटक केली आहे.

अपहरण झालेल्या मुलीचे कुटुंब कोरोना काळात येवला येथील आपल्या शेतीवर राहत होते, दोनच दिवसांपूर्वी शनिवारी ते कोपरगाव येथे पुन्हा आले होते.

आरोपी राजू पोपट पगारे (३५, रा. तळवडे ता. येवला) या लग्न झालेल्या तरुणाने या बारा वर्षाच्या मुलीला बळजबरीने लग्न करण्यासाठी पळवून नेले होते.

आरोपीला अटक करण्यात आली आहे.दुसरी मुलगी १६ वर्षांची असून ती लहानसहान कामे करते, सोमवारी (१५) रोजी रात्री कामास गेली होती. त्यानंतर ती घरी आलीच नाही.

म्हणून तिच्या पालकांनी तिची सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. मुलीच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तिने पळवून नेल्याची कोपरगाव शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24